15 January, 2016

भिगवण... भाग ०१

डि.एस.एल.आर कॅमेरा बराच आधी हातात आला होता तरी पक्षी निरीक्षणाचा छंद त्यामानाने उशिरा लागला. दरम्यानच्या काळात अनेकदा वर्तमानपत्रात मी ठिक-ठिकाणच्या अभ्याससहली बद्दल वाचायचे. त्यातुनच काही वर्षापुर्वी मी पेंच अभयारण्य पाहिलं. आवडलं. पण पक्षी किंवा प्राणी समोर दिसला तरच गाडी थांबवली गेली होती. त्यामुळे फारसं काही हाती लागलं नव्हतं. मध्ये अनेक महिने गेले. अगदी अचानकच गेल्या नोव्हेंबर २०१४ ला ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंच ने आयोजित केलेल्या भीमाशंकर - पक्षी निरीक्षण भटंकती ला जावं असं मनात आलं. पैसे भरले आणि दुसर्‍याच दिवशी मी सर्दी-खोकल्याने आजारी पडले. सर्दी-खोकल्याने बेजार झाले होते तरी काय होईल ते होऊ दे आपण जायचंच असं ठाम ठरवुन मी गेले. माझ्या सुदैवाने त्यावेळचा गृप लहान होता आणि मुख्य म्हणजे अतिशय समजंसपणे सर्वांनी मला सांभाळुन घेतलं. मला वैयक्तिक रित्या फारसं पक्षी निरीक्षण करता आलं नाही. अजुन वाईट म्हणजे या सहलीचे माझे सगळे फोटो डिलिट झाले. असं असलं तरी मला जे काही थोडंफार बघता आलं त्यातुन मी बरंच शिकले. नुसते फोटो काढता येणं महत्वाचं नाही तर तास-दोन तास सलग बसुन मुळात पक्षी निरीक्षण कसं करायचं आणि का करायचं? पक्ष्यांची जातकुळी कशी ओळखायची? (How to identify birds?) हा मुलभुत अभ्यास (Base-Study) माझा या सहलीमुळे पक्का व्हायला मदत झाली.

हा गेल्यावेळचा अनुभव लक्षात ठेवुन मी पुन्हा एकदा ०९-१० जानेवारीला भिगवण येथे होणार्‍या पक्षी निरीक्षण भटंकती साठी नाव नोंदवलं. खर्‍या अर्थाने ही माझी पहिली अभ्यास-भटंकती !! खरंतर मला माझा कंफर्ट झोन सापडायला जरा वेळच लागतो. पण माझ्या सोबत असलेल्या उत्साही आणि अभ्यासु लोकांसोबत मी केव्हा त्यांच्यातली एक झाले समजलंदेखील नाही.

०९ तारखेला दुपारी २-२.३० ला भिगवणला पोचलो. आमचा लिडर (म्होरक्या) - अविनाश भगत याने अर्थात दुपारच्या जेवणाची कल्पना आधीच देऊन ठेवलेली. त्यामुळे पोचल्यावर फार वेळ वाट पाहायला लागली नाही. गरमागरम ज्वारीच्या भाकर्‍या, पिठलं, वांग्याचा रस्सा, ठेचा आणि भात... मांसाहार करणार्‍या लोकांना मात्र बहुधा जरासं जास्त थांबावं लागलं. पण आम्ही सारेच पोटभर जेवलो. मला तर जेवल्यावर छान ताणुन द्यावी वाटत होती ... पण बोट राईड साठी जाणं भाग होतं. त्याच साठी तर आलेलो न आम्ही ! थोडं बसने आणि थोडं चालुन आम्ही बोटींजवळ पोहोचलो. तिथेच खरंतर अनेक पक्षी दिसायला सुरुवात झालेली. कुठे किर/केगो (Gulls), कुठे शेकाट्या (Indian Black-winged Stilt), काही ठिकाणी बगळ्यांचे थवे (Flock of Egrets) ... भिगवण काय चीझ आहे, अंदाज यायला लागला. मग मात्र माझी झोप उडालीच. दोन बोटीं मध्ये पटापट सर्वांनी जागा पकडल्या आणि एकदाचे जायला आम्ही उत्साहात तयार !!! पण .... ओम-फस्स.... आमच्या सर्वाचं एकत्रित वजन जास्त व्हायला लागलं... मग मी आणि आमच्यातले अजुन चार-पाच जण खाली उतरलो आणि तिसर्‍या बोटीत जाऊन बसलो. प्रवास सुरु झाला. आमच्या बरोबर दुसर्‍या पक्षी अभ्यासक क्लॅरा कोरीआ होत्या. त्यांनी काळ्या डोक्याची केगो (Black-headed Gull) आणि तपकिरी डोक्याची केगो (Brown-headed Gull), तसंच चिमण केगो (Pallas Gull), कुररी (Indian Whiskered Tern) आणि नदी कुररी (River Tern) यातला फरक सांगितला. त्या ओळखायच्या सोप्या पध्दती सांगितल्या. बरोबरीने आम्हांला तो ओळखायला लावला. मी काय किंवा इतर काय शाळकरी पोरांसारखे धांदरटपणे लगेच कोणतीही कुररी (Tern) किंवा केगो (Gull) दिसला की सांगायला सुरुवात करायचो. आमचं चुकलं तरी न कंटाळता क्लॅरा मॅम नी पुन्हा फरक सांगितला. मग मात्र जरा बरी उत्तरं आमच्याकडुन मिळायला लागली. त्या संध्याकाळच्या फेरीत मला बरेच पक्षी दिसले. मजा येत होती. हळु हळु सुर्य मावळत चाललेला पण ज्यासाठी आलेलो ते रोहित पक्षी (Flamingos) मात्र काही दिसत नव्हते. अचानक आकाशात दुरवर असे रोहित उडत जाताना दिसले. चला... निदान थोडं का असेना पण रोहित पक्ष्यांनी दर्शन दिलं. मग इतर पक्षी पाहायचा, ते ओळखायचा माझा उत्साह अजुनच वाढला.

मग मात्र एकदम अंधार पसरायला लागला आणि मला नाईट ट्रेलचे वेध लागायला सुरुवात झाली. भीमाशंकरला गेलेले असताना अविनाश आणि क्लॅरा मॅम नी रातवा आणि मांजर दाखवलेलं. त्यामुळे असा रात्रीचा फेरफटका देखील काहीतरी देऊन जातो हे मला माहीत होतं. पुन्हा आमच्या कॉटेजजवळ आलो. चहा घेतला आणि साधारण ७.०० च्या आसपास बाहेर पडलो. चांगल्या लांबवर प्रकाश देणार्‍या टॉर्चची गरज आणि फायदा मला भीमाशंकरच्या वेळेस नीटच समजलेला. तो माझ्यासाठी महत्वाचा धडा होता तेव्हा…. पाणी, कॅमेरा आणि महत्वाचं शस्त्र टॉर्च ! आणि हो, अंगात स्वेटर-कान टोपी... सगळा जामानिमा करुन सर्वांबरोबर मी बाहेर पडले. पहिलं दर्शन झालं ते रंग बदलणार्‍या सरड्याचं (Chameleon). फटाफट फोटो घेतले गेले. मग ह्या झुडुपावर टॉर्च मार, तिथे मार असं करत असतानाच कोणा-कोणाला अजुन एकेक काय दिसायला लागलं. आम्ही थोडं उंचीवरुन चालत होतो. तितक्यात खाली काहींना रातवा (Indian Jungle Nightjar) दिसला. लगेच आमच्यातले अजुन काहीजण अविनाशसोबत खाली उतरले आणि फोटो काढुन आले. मला एकतर अंधारात उतरताना धडपडायची भिती वाटली. दुसरं महत्वाचं म्हणजे संध्याकाळी बरेच फोटो काढल्याने कॅमेर्‍याची बॅटरी अर्धी झाली. पुढे काही दिसलंच तर या विचाराने माझं एकीकडे बॅटरी रेशनिंग सुरु होतं. नंतर अजुन आमच्यातल्याच मोजक्या सुदैवी लोकांना चिंकारा देखील दिसला म्हणे! मला मात्र तो तिथे होता याचा पत्तादेखील नंतर खोलीवर आल्यावर लागला… अर्ध्याहुन अधिक वेळेस माझं असंच, वरातीमागुन घोडे ! परत येत असताना मस्तपैकी नांगी उभारुन बसलेला विंचु दिसला आणि एक-दोन किडे-मकोडे दिसले.

खोलीवर आलो. विचार केलेला... हात-पाय धुऊ,तोंडावर पाण्याचे हबके मारु... दिवसभराच्या प्रवासाचा शीण जाईल. मग निवांत फिल्ड गाईड घेऊन बसुयात. असं मनात छान स्वप्नं रंगवत मी खोलीवर परतले. स्वेटर काढला आणि बाहेर असलेल्या बेसिन पाशी गेले. पाण्याचा एकच हबका तोंडावर मारला. आजु-बाजुचा थंडगार वारा ओल्या चेहर्‍याला लागला आणि दात वाजायला लागले.... पुढे काय अजुन तोंडावर पाणी मारते मी... नॅपकीनने कसंबसं तोंड पुसुन सगळ्यात आधी स्वेटर अंगात चढवला. आणि चुप्प एका जागी बसुन राहिले. काही सुचेनाच. हात आणि गालांबरोबरच डोकंपण बहुदा बधीर झालेलं माझं. पण पाणी मात्र कसं कोण जाणे तितकं थंडगार नव्हतं हे त्याही परिस्थितीत जाणवलं. त्यांचे पाईप्स गार कसे पडले नव्हते काय माहित. मग जराशाने उब आली आणि डोकं काम करायला लागलं. मग बॅगेतुन गरम पाण्याचा थर्मास काढला. पाणी प्यायले. मग मात्र पहिला उत्साह परत आला. जे काही झालं ते जेमतेम ८-१० मिनिटंच पण त्या तितक्या वेळेत मला गंगोत्री-गोमुखची थंडी, सरहानची थंडी, सिक्कीम-पेलिंगची थंडी सगळं आठवलं. मग मात्र मी निवांत फिल्ड गाईड बघायला घेतलं. मला संध्याकाळच्या वेळेस जे पक्षी ओळखता आले नसले तरी आता ते फिल्ड गाईड वरुन मला ओळखता आले. एकुणच पुर्ण सहलीभर पक्ष्यांची ओळख कशी पटवायची ह्याबद्दल या आधीच्या सहलीत आणि आताही अविनाशकडुन आणि क्लॅरा मॅम कडुन सतत सुचना होत होत्या त्याचा खुप उपयोग होत होता. माझ्या ह्या पहिल्याच फेरफटक्यात मी जवळपास २० पक्षी ओळखले होते. मला भयंकर आनंद झालेला. तितक्यात जेवायला तयार आहे अशी हाक आली. खोलीत गार नसलं तरी बाहेर तुलनेने गार वाटत होतं. गरमागरम वाफाळतं जेवत असतानाच मला दिवसभराचा शीण जाणवायला लागलेला. पटापटा जेवुन खोलीवर आले.

मेल्यासारखे गाढ झो - प - ले.

No comments:

Post a Comment